एसटी चालकाला झोप लागल्याने झालेल्या अपघातात 21 प्रवासी जखमी

कोरेगाव भीमा : अंबड -पुणे एसटीबसच्या चालकाला झोप लागल्याने बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून एका दुकानात घुसल्याने झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले तर दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना पुणे-नगर महामार्गावरील सणसवाडी (ता. शिरूर) याठिकाणी आज घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , बसचालक श्यामराव बबन जाधव (रा. दुसरेबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) व वाहक भगवान भीमराव मसुरे (रा. राममंदिर गल्ली, अंबड) हे दोघे देखील जखमी झाले आहे. तर याबाबत राहुल ज्ञानदेव जगताप (रा. शास्त्रीचौक, आळंदी रोड, भोसरी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. एसटी बस (एमएच २०, बीएल ३०६३) चालक जाधव यांचा झोप लागल्याने ताबा सुटला आणि बस रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. पुढे जाऊन आबासाहेब दरेकर यांच्या यश अ‍ॅटोमोबाईल्स दुकानात घुसली. बसचा वेग जास्त असल्यामुळे दुकानाच्या मागील बाजूस असलेली भिंतदेखील ढासळली, दुसरी ३0 फुटांची भिंतदेखील सरकली गेली.

जखमींना तातडीने शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही प्रवाशांची प्रकृतीदेखील गंभीर आहे. यामध्ये शिवजय गंगाराम माने (वय ६६), मनोज मदन बोरावकर (वय ३५), आशाबाई शिवदास माने (वय ६०, सर्व रा. चिखली, पुणे), तुकाराम पंढरीनाथ कुमते (वय ७०), नानाबाई तुकाराम कुमते (वय ६५, दोघे रा. शिरसवडी), रामेश्वर गणपत कोंडे (वय ७०), प्रवीण रामदास क्षीरसागर (वय २४, रा. अकोला), राहुल ज्ञानदेव जगताप (रा. शास्त्रीचौक, आळंदी रोड, भोसरी, पुणे), विष्णू गुलाबराव गिरी (वय ५०, रा. वाडेगाव, बाळापूर, अकोला), शंकर लोखंडे (वय १८, रा. बिबवेवाडी, पुणे) यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर बाबूराव मांगुल (वय ७५, रा. चौधरी पार्क, दिघी, पुणे) आदींना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस नाईक संजय ढमाल, विजय गाले यांनी घटनास्थळी भेट दिली.