वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या योगदानाकडे काही लोकांनी दुर्लक्ष केलं – मोदी

नवी दिल्ली: लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या योगदानाकडे काही लोकांनी दुर्लक्ष केलं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, सरदार पटेल यांचं योगदान विस्मृतीत जावं, यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले.

‘सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत आहे. त्यांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा देशाला अभिमान आहे. मात्र पटेल यांचे योगदान लोकांनी विसरावे, यासाठी काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. तरीही देशातील तरुणांच्या मनात सरदार पटेल यांच्याविषयी अतिशय आदराची भावना आहे. देशाला एकसंघ ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.. त्यामुळेच देशातील तरुणाई त्यांच्याकडे आदराने पाहते,’ असंही मोदींनी म्हंटलं.

लोहपुरुष या नावाने ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठी भूमिका बजावली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले पटेल देशाचे पहिले गृहमंत्री होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक भागांमध्ये स्वतंत्र संस्थाने होती. या संस्थानांचे विलीनीकरण करुन त्यांचा समावेश भारतात करण्याची कामगिरी पटेल यांनी यशस्वी केली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात देशाला एकसंध राखण्याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. याशिवाय सरदार सिंग, दीपा कर्माकर, सुरेश रैना आणि कर्नाम मल्लेश्वरी यांच्यासारखे क्रीडा जगतातील चेहरेदेखील यावेळी हजर होते.