… म्हणूनच मनसेचे नेते पक्ष सोडून जातात; राजवर व्यंगचित्रातून टीका

भाजपच्या सोशल मीडियाने उडवली खिल्ली

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी आपल्या व्यंगचित्रातून अनेक लोकांनावर निशाणा साधतात. मात्र, यंदा याच व्यंगचित्रावरून राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बुधवारी राज ठाकरेंनी मोदी सरकार आणि संभाजी भिडे यांच्यावर व्यंगचित्रातून हल्लाबोल केला होता. मात्र, आज त्याच व्यंगचित्रावरून सोशल मीडियाच्या साहाय्याने राज ठाकरेंवर टीका केली जात आहे.

सरकारी अधिकारी होण्यासाठी तरुण अनेक वर्ष मेहनत घेतात. मात्र आता मोदी सरकार खासगी क्षेत्रातील लोकांना संधी देऊन या तरुणांवर अन्याय करत आहे, अशा अर्थाचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं होतं. यामध्ये एक व्यक्ती अभ्यास करताना दाखवण्यात आली होती. तर खासगी क्षेत्रातील दुसरी व्यक्ती त्याच्या अंगावरुन उडी मारुन पुढे निघून जाताना दिसत होती. या व्यक्तीचं पंतप्रधान मोदी स्वागत करत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं होतं. या चित्रात मोदींसोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उद्योगपतीही दाखवण्यात आले होते.

राज ठाकरेंच्या याच व्यंगचित्राला प्रत्युत्तर देणारं व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ‘बारामतीच्या बळावर’ असं शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आलं आहे. यामध्ये राज ठाकरे व्यंगचित्र रेखाटताना दाखवण्यात आले आहेत. राज ठाकरे फक्त व्यंगचित्रात मग्न असल्यानं त्यांच्याकडे पक्षाकडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे मनसेचे नेते पक्षाला रामराम करत आहेत, असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. ‘हम व्यंगचित्र बनाते रहे, और लोग हमसे दूर जाते रहे,’ अशी ओळ व्यंगचित्रातील राज यांच्या पाठीवर आहे. मनसेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वागत करत असल्याचं या चित्रात दिसतं आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. सध्या या व्यंगचित्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

यादरम्यान, राज ठाकरे यांनी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची खिल्ली उडवतांना सुद्धा एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. त्याच्यावरही सोशल मीडियावरुन जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. राज ठाकरेंच्या त्या व्यंगचित्रात राज ठाकरेंवर ‘बारामतीचा पोपट’ असा निशाना साधण्यात आला आहे.

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी रविवारी नाशिकमध्ये ‘माझ्या बागेतील आंबा खाल्याने अपत्यप्राप्ती होते हे विधान केल्याचे प्रसारमाध्यमात व्हायरल झाले होते. त्यानंतर भिडे यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यातच राज यांनी भिडेंचा व्यंगचित्रातून समाचार घेतला. राज यांनी व्यंगचित्रात दोन महिला दाखवल्या होत्या. त्यातील एका बाईच्या हातात बाळ होतं. या बाळाच्या तोंडात आंबा दाखवण्यात आला होता. या बाळाला पाहून दुसरी बाई ‘अय्या ! भिडेंच्या बागेतून वाटतं’, असं म्हणताना दिसत होती. तर राज ठाकरेंची खिल्ली उडवणाऱ्या छायाचित्रातही दोन महिला आहेत. त्यातील एका महिलेच्या हातात बाळ असून दुसरी महिला ‘अय्या! बारामतीच्या बागेतून आलेला पोपट वाटतं’, असं म्हणताना दाखवण्यात आली आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढल्याचे पाहून व्यंगचित्रातून ही टीका करण्यात आल्याचे बोलले जात आहे.