कर्नाटकातही गोवा, मणिपूर आणि मेघालयचा ‘फॉर्म्यूला लागू व्हावा : येचुरी

नवी दिल्ली : भाजपा सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी गोवा, मणिपूर आणि मेघालयात सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले नव्हते . या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही हा नियम लागू व्हावा असे मत सीपीआयचे(एम) महासचिव सिताराम येचुरी यांनी दिले . तसेच भाजपाला यात सामील न होऊ देता त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र रहावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

येचुरी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या एका ट्विटचं उदाहरणही दिलं, ज्यामध्ये जेटलींनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी मिळावी असं म्हटलं आहे. यावरून येचुरी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले . निवडणूक हारुनही सरकार बनवणं हे भाजपाला चांगल्या प्रकारे येते असे ते म्हणाले .

भाजपा सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी गोवा, मणिपूर आणि मेघालयात सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले नव्हते . २०१७ मध्ये गोव्यात ४० जागांपैकी १७ जागा काँग्रेसकडे होत्या. मणिपूरमध्ये ६० जागांपैकी २८ जागा काँग्रेस जिंकली, तर मेघालयातही ६० पैकी २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी दिली नव्हती, त्यामुळे आता याच नियमांचं पालन व्हायला हवं असं ट्विटरद्वारे येचुरी म्हणाले.