श्रीदेवीची हत्या सुनियोजित; एसीपीच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली : जगभरातील सिनेप्रेमींना मोठा धक्का देऊन गेलेली बॉलिवूडची ‘हवा हवाई’, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता आणखीचं वाढत चाललं आहे. श्रीदेवींचा मृत्यू अपघाताने किंवा आकस्मिक झालेला नव्हता, तो सुनियोजित खून होता, असा खळबळजनक दावा दिल्लीतील एका माजी पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. वेद भूषण असं त्यांचं नाव असून ते सध्या खासगी तपास संस्था संचालित करतात.

श्रीदेवींचा मृत्यू ज्या खोलीत झाला, त्या खोलीत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने वेद भूषण यांनी त्यांच्या त्याच्या शेजारच्या खोलीत मुक्काम केला होता. त्या रात्री श्रीदेवी यांच्या खोलीत काय घडलं असेल, कसं घडलं असेल, हा प्रसंग त्यांनी अगदी बारकाईने तपासून पाहिला. त्यावरून, या प्रकरणात काहीतरी काळबेर असल्याचा त्यांना दाट संशय वाटतोय. याबाबतची बातमी एका वृत्तपत्राने दिली असून, श्रीदेवींच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्नांची समर्थनीय उत्तरंच मिळत नसल्याचा दावा वेद भूषण यांनी केला आहे. एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास बंद होईपर्यँत त्याला बाथटबमध्ये जबरदस्तीने बुडवून ठेवणे शक्य आहे. त्यात फारसा पुरावा मागे उरत नाही आणि हे सगळंच कसं अपघाती होतं, हे सहज भासवता येतं. तसंच काहीसं श्रीदेवींच्या बाबतीतही झालं आहे. असं वेद भूषण यांनी म्हटले आहे.