श्री सिद्धिविनायक मंदिरात भरती घोटाळा; हिंदू जनजागृती समितीचा आरोप

मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिरात राज्य शासनाने आकृतीबंधान्वये आखून दिलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. देवस्थानाला भाविकांनी अर्पण केलेल्या धनातून या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा मंदिराच्या माजी विश्वस्तांकडून अपहार केला आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात विधी व न्याय विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार शासनाने श्री सिद्धिविनायक मंदिरात १५८ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला अनुमती दिली होती. मात्र, शासनाच्या निर्णयाची अवमानना करत देवस्थानामध्ये २१३ कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यात २० पुजाऱ्यांच्या जागी ३१ पुजारी, २७ पहारेकऱ्यांच्या जागी ६२ पहारेकरी , सर्वसामान्य कामगार १५ असताना ६६ कामगार , २० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जागी २७ कर्मचारी, ३ वायरमन पदाच्या जागी ६ वायरमन कर्मचारी, अशा प्रकारे राज्य शासनाची कुठलीही परवानगी न घेता ११२ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनधिकृतपणे करण्यात आली आहे.