धक्कादायक ! मंदिरात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पिंपरी-चिंचवड : शहरात मंदिराच्या परिसरात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी येथे भागवत गीता मंदिरात हा प्रकार घडला . रोहन भांडेकर असे आरोपीचे नाव असून तो याच मंदिराच्या जवळच राहतो. शनिवारी सकाळी पीडित मुलगी मंदिराच्या समोर एकटीच खेळत होती. यावेळी आरोपी त्याठिकाणी आला आणि आपण मंदिराच्या पाठीमागे खेळू असे म्हणत तिला मंदिरात घेऊ गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेची माहिती पीडित मुलीने तिच्या आईला व आजीला दिली. त्यानुसार त्यांनी पिंपरी पोलिस ठाणे येथे आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. रविवारी आरोपी रोहन याला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. आरोपी रोहण भांडेकर आणि त्याची आई हे भागवत गीता मंदिराची साफ सफाईचे काम करतात. मात्र, त्या दिवशी आरोपीची आई नव्हती आणि सकाळीच मंदिराच्या परिसराची स्वछता केली होती. मात्र, या घटनेमुळे शहरातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला गजाआड करून न्यायालयात हजर केले त्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.