नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपशी केलेली ‘डील’ : विखे पाटील

मुंबई : ‘नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेले शिवसेनेचे आंदोलन केवळ एक सोंग आहे. हे आंदोलन म्हणजे भाजप-शिवसेनेचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे.’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु आहे. मात्र, आता याच वादात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे

यावेळी विखे पाटील म्हणाले, ‘मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा आहे. परंतु, आपली सत्ता असतांना हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे पाप त्यांना आपल्या माथी मारायचे नाही. म्हणून भाजपने शिवसेनेला हाताशी धरले आहे. दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनितीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपने सुरुवातीला या प्रकल्पाची बदल करत काही काळाने जनतेची इच्छा पूर्ण करत असल्याची सांगत हा प्रकल्प रद्द करायचा.’ असा आरोप विखे पाटील यांनी केला.

‘या प्रकरणामध्ये भाजप-शिवसेना दोघेही मिळून सोंग रचून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.एकीकडे शिवसेनेचे उद्योग मंत्री विधानसभेत हा प्रकल्प रद्द केल्याचे सांगतात. तर दुसरीकडे भाजपचे केंद्र सरकार या प्रकल्पाला विविध प्रकारच्या मान्यता देते.’असे म्हणत विखे-पाटलांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला.