शिवसेनेचा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : खा. चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : दंगलीचा निषेध करण्याबरोबरच पोलिसांची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू शक्ती मोर्चा काढण्यात येणार असून पूर्वीप्रमाणे रस्त्यावर येऊन शिवसेना काय चीज आहे हे दाखवून दिले जाईल, असा इशारा शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. दंगलीत पोलिसांना आम्हीच संरक्षण दिले आणि आता सरकारच्या दबावाखाली पोलिस आमच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचे ते म्हणाले.

शहरातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून यास परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर विनापरवानगी मोर्चा काढण्याची आमची तयारी असल्याचेही खैरे यांनी आज येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेस संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदी उपस्थित होते. मोर्चा पैठण गेट, सिटी चौक, शहागंज, चेलीपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल, असे खैरे म्हणाले.

मुस्लिम बहुल भागात काँग्रेसचे वर्चस्व वाढत असल्याने एमआयएमला अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांनी ही दंगल घडवली. आम्ही वेळीच पोलिसांना कल्पना दिली होती. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता तर दंगल झालीच नसती. परंतु थोडेसेच पोलिस तेथे आले. मिटमिट्यात कचरा नेऊन टाकण्यासाठी 150 अधिकारी आणि 700 पोलिस तैनात करण्यात आले होते. येथे दंगल सुरू असताना काहीही बळ पुरवण्यात आले नाही.
दंगल पोलिसांनीच घडवली : दानवे

गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदावरून अधिकाऱ्यांत वाद आहे. आयुक्त शहरात नाहीत. दोन उपायुक्त रजेवर आहेत. या राजकारणातून रॉकेल माफिया व पत्ते क्लब चालवणाऱ्यांच्या मदतीने ही दंगल पोलिसांनी घडवली असा थेट आरोप जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला. शहरात एसआरपी असताना जालन्याहून मागवण्यात आली. क्यूआरटी (शीघ्र कृती दल) का आली नाही? असा सवाल करताना ते म्हणाले अधिकाऱ्यांत आपसात वाद आहे. त्यामुळे अन्य पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांनी कुमक पाठवली नाही. पत्त्यांचे क्लब चालवणारे व रॉकेल माफियांनी रॉकेल व अन्य साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानंतर मुस्लिम तरुण दंगल करताना दिसू नये म्हणून त्यांनीच सीसीटीव्हीचे फुटेज गायब केल्याचेही ते म्हणाले.