भंडाऱ्यात सेनेला जबर धक्का; जिल्हाप्रमुखाचा भाजपात प्रवेश

भंडारा : लोकसभा पोटनिवडणुक अगदी तोंडावर असतांना शिवसेनेला भंडाऱ्यात मोठा धक्का बसला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने पक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘रामराम’ ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

नागपुरात राजेंद्र पटले यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत शिवसेनेसोबत फारकत घेतली. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, भाजपला भंडाऱ्यात परत एकदा पोवार समाजाचे नेतृत्व करणारा नेता हाती आल्यामुळे आगामी निवडणुकीत याचा मोठा लाभ होणार आहे. विशेषतः भाजपला राजेंद्र पटले यांचा तुमसर विधानसभा मतदारसंघातचांगलाच लाभ होणार आहे. शिवाय या लोकसभा पोटनिवडणुकीतही ते भाजपला मदत करणार असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठा सामना करावा लागणार आहे.

शिवसेनेसोबत नाराज असलेल्या पटलेंना भाजपाने आपल्या गळाला लावल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजेंद्र पटले हे पोवार समाजाचे प्रतिनिधित्व करीत असून तुमसरचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे तुमसरचे असून पटले भाजपसोबत आल्यास त्यांचा भाजपला लाभ होऊ शकतो, अशी आशा भाजपाला आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या एका नेत्याने पटले यांच्याशी संपर्क साधला. आणि भाजपची ही खेळी यशस्वी ठरली आहे.