शिवसेनेच्या मंत्र्यांना कुठलीही किंमत नाही – विखे पाटील

नागपूर : नागपुरात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सध्या नाणार प्रकल्पाचा मुद्दा गाजत आहे. कोकणात प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये विधानसभेच्या सभागृहात खडाजंगीउडतांना दिसून येत आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनाच लक्ष केलं आहे. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळच्या बैठकीत कुठलंही भाष्य करत नाहीत. प्रकल्पाची त्यांना माहिती नाही. सेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बिस्कीट खायला जातात का, असा सवाल करीत उद्योग मंत्र्यांना मंत्रिमंडळात काहीच किंमत नसल्याची टीका पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

गेल्या आठवड्याभरापासून नाणार प्रकल्पाचा मुद्दा विधानसभेत आणि विधानपरिषदेत चांगलाच गाजत आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेना दोघांवरही सडकून टीका केली. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाच्या माध्यमातून हा प्रकल्प लादला जाणार नाही असे सभागृहात सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले निवेदन असमाधानकारक व दिशाभूल करणारे होते. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की, नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर तो लादला जाणार नाही. तर दुसरीकडे केंद्रातील भाजपाचे सरकार विदेशी कंपन्यांसोबत करार करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोकण वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करतायेत हे उघड झाले आहे. जर मुख्यमंत्र्यांना स्थानिकांशी चर्चा करायची होती तर करार का करण्यात आले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विखे पाटील यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचाही चांगलाच समाचार घेतला. नाणार प्रकल्प रद्द करावा म्हणून शिवसेनेचे आमदार विधानसभेत गोंधळ करत असताना शिवसेनेचे मंत्री शासकीय कामकाजात सहभागी होतात. नाणार प्रकल्पाची भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याच्या प्रस्तावावर सही केली असून, मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी फाईल पाठविल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई सांगतात. उद्योग मंत्र्यांच्या सहीला कुठलीच किंमत राहिलेली नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सत्ताधारी भाजपाने हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला असून शिवसेनेसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी याला विरोध करीत आहे. या प्रकल्पावरून सातत्याने सभागृहाचे कामकाजही ठप्प पाडले जात आहे. सत्तेत असूनही शिवसेनेला आंदोलन करावे लागत आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका केली जात आहे.