शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सूर्यकांत दळवींचा कदमांवर आरोप

रत्नागिरी : शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीत रामदास कदमांनी शिवसेनेसोबत वेळोवेळी गद्दारी केली आहे, अशी टीका माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केली आहे, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली.

२५ वर्षे दापोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत होता, मात्र रामदास कदमांमुळे माझा पराभव झाला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अनंत गीते, किशोर कानडे यांच्यासारख्या अनेकांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कदमांनी मोठे प्रयत्न केले आहेत, त्यामुळे आता तरी शिवसैनिकांनी अस्तानीतला निखारा कोण आहे? हे ओळखा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अनंत गीते यांनीही औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात जाहीरपणे रामदास कदम यांच्यावर आरोप केला होता. ”शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मला राजकारणातून बाद करण्याचा विडा उचलला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत मी कमी मताने निवडून आलो. नंतर त्यांनी माझी दिलगिरी व्यक्त केली, कारण त्यांच्या मुलाला आमदार करायचं होतं. तसा प्रसंग महाराष्ट्रात कुणाच्याही नशिबी येऊ नये एवढीच अपेक्षा आहे,” असं गीते म्हणाले होते.