शिक्षक मतदार संघातून शेंडगे यांना निवडून आणण्याचा शिवसेनेचा निर्धार

मुंबई : शिक्षक मतदार संघाच्या येत्या 25 जून रोजी होणा-या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने रणनीती आखली असून या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा.शिवाजी शेंडगे यांना निवडून आणण्याचा ठाम निर्धार शिवसेनेने केला आहे. आज दुपारी सेनाभवनात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची महत्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. यावेळी शेंडगे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये असलेली शिक्षकांची मते शिवसेनेलाच मिळण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी प्रत्येक शिक्षकांच्या घरी जाऊन थेट संपर्क साधावा. शिवसेनेचा शिक्षक उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्यावर त्याच्या मागे शिवसेनेची ताकद असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न शिवसेना चांगल्या प्रकारे सोडवू शकेल, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रथमच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे.

शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी जातीने लक्ष घालून मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये असलेल्या शिक्षक मतदारांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. यावेळी खासदार अनिल देसाई,आमदार प्रकाश सुर्वे, उपमहापौर हेमांगी वरळीकर,सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.