मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनच्याविरुद्ध शिवसेना आक्रमक

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट, बुलेट ट्रेनच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीतर्फे आयोजित मोर्चाला पाठिंबा दिला असून मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समितीची भूमिका जाणून घेत त्यांच्या पाठिशी उभ राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होऊ शकतात, असे सेना वर्तुळातून सांगण्यात येतंय. त्यामुळे पालघरमध्ये भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

स्थानिक लोकांचा जमीन अधिग्रहणाला विरोध असेल तर शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी राहिल, असे आश्वासन देत उद्धव ठाकरे यांनी कृती समितीच्यावतीने येत्या ३ जून रोजी पालघरमध्ये आयोजित मोर्चाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असून पालघरमध्ये रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बुलेट ट्रेनविरोधी या मोर्चाला मनसेने या आधीच पाठिंबा दिला आहे. त्यात शिवसेनेनेही पाठिंबा जाहीर केल्याने भाजपसमोरची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पालघरची पोटनिवडणुक तोंडावर आल्यानं सेनेकडून ही भूमिका घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. .