शिवसेना आक्रमक, दुकानदारांना मराठी पाट्यांसाठी दिली ३० जून पर्यंतची मुदत

मुंबई : शिवसेनेना पुन्हा एकदा मराठीच्या मुद्दयावर आक्रमक झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुकानांच्या पाटया मराठीत करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दुकानदारांना दिली आहे. जे दुकानदार दिलेल्या मुदतीत दुकानांच्या पाटया मराठीत करणार नाहीत त्या पाटयांना काळे फासा असे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, २००८ मध्ये मराठीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले होते. त्यामुळे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना वळल्याचे बोलले जात आहे.

आज मुंबईत शिवसेनेची बैठक झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकाना महत्वाच्या सूचना केल्या. मराठी पाटयांचा मूळ मुद्दा शिवसेनेचा आहे. शिवसेनेने स्थापनेच्यावेळी मराठी पाटयांचा विषय हाती घेतला होता. मध्यंतरी हा मुद्दा मनसेने आत्मसात केला होता. त्यानंतर अनेक दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लागल्याचे दिसून आहे. दरम्यान, मुंबई विकास आराखडा मराठी भाषेत देण्यासाठी प्रशासनाकडे आग्रही मागणी करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. काही विकासक आपल्या प्रकल्पांच्या जाहिरातीत मुंबईतील जागांची नावं मुद्दाम बदलत आहेत. न्यू कफ परेड, अप्पर वर्ली, अप्पर जुहू याठिकाणांची नावे बदलण्याचा घाट आहे. नाव बदलण्याचा हा घाट महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या. विकासक ऐकत नसेल तर प्रसंगी विकासकला शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्या, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, शिवसेनेने आगामी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदार मोठया प्रमाणावर भाजपाकडे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही महत्वाच्या निवडणुका शिवसेना-भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. आगामी काळात मराठी मतदाराने भाजपाकडे जाऊ नये हे सुद्धा मराठी पाटयांच्या आंदोलनामागचे राजकीय गणित असू शकते. दुसऱ्या बाजूला मनसेची राजकीय ताकत सध्या कमी झाली असली तरी मराठीचा मुद्दा मनसेसाठीही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे मनसेही हा विषय सोडणार नाही. पुढच्या काही दिवसात मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.