‘नाणार’ परिसरात जास्त जमिनी शिवसेना नेत्यांच्या – नारायण राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी घोषणा शिवसेनेने केली असली तरी, शिवसेनेच्या काही नेत्यांनी नाणारच्या प्रकल्पात जमिनी विकत घेतल्या असून प्रकल्प झाल्यास त्या जास्तीजास्त किमतीत विकून ते फायदा करून घेतील असा गौप्यस्फोट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

यावेळी त्यांनी शिवसेना ,नाणार प्रकल्प ,राज्याचं राजकारण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेना हा पळपुटा पक्ष आहे, त्यांना केवळ आपला लाभ करून घ्यायचा आहे जोरदार टीका करत त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. तसंच नाणारला शिवसेनेचा विरोध म्हणजे शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे असंही ते म्हणाले. या प्रकल्पात शिवसेनेच्या नेत्यांच्याच जमिनी जास्त असून त्यांची नाव जमिनी क्रमांकासह आपल्याकडे आहेत ती योग्यवेळी जाहीर करू हे असा कडक इशाराही त्यांनी दिला. त्यांना उघड पाडण्यात आपण काहीच कसर सोडणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

तर दुसरीकडे राज्यसभेवर पाठवणाऱ्या भाजपने कणकवलीच्या निवडणुकीत आपली विचारपूसही केली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपण एकटे शिवसेनेला पुरु शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनाही असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यसभेवर मनाविरूद्ध कुणाच्या दबावापाई नाही तर राज्याचं भलं करण्यासाठीच गेलो आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.