शिवसैनिकांच्या हत्याऱ्यांना फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – एकनाथ शिंदे

अहमदनगर : केडगाव येथे दोन शिवसैनिकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली असून हत्या करणाऱ्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच हत्या झाल्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यात चूक काय, असा सवाल करीत शिवसैनिकांवर लावण्यात आलेले ३०८ कलम पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणीही शिंदे यांनी केली.

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात मयत झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे म्हणाले की, केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिका-यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी केडगाव येथे भावना व्यक्त केल्या. ती दंगल नव्हती, असे म्हणत शिंदे यांनी शिवसैनिकांचे समर्थन केले.

तसेच पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांवर लावलेले ३०८ चे कलम मागे घ्यावे अशी मागणी केली़. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या संगनमताने शिवसैनिकांची हत्या झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाच्या मागे सेना खंबिरपणे उभी आहे. पोलिसांनी हत्येच्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या सर्वांचे कॉल डिटेल्स तपासावेत, असेही एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.