आयसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शशांक मनोहर यांची नियुक्ती

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. 2016 साली मनोहर यांनी पहिल्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळला होता. त्यावेळी त्यांनी जगातिक क्रिकेटमध्ये बरेच बदल घडवून आणले, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आयसीसीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.

अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झाल्यावर मनोहर यांनी सांगितले की, ” आयसीसीच्या अध्यक्षपदी फेरनिवड होणे, हा माझा बहुमानच आहे. आयसीसीच्या सदस्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि पाठिंबा दिला, त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. आगामी दोन वर्षांत आम्ही सारे एकजुटीने क्रिकेटचा अजून चांगला विकास कसा होईल, याबाबत निर्णय घेऊ. “