शरीरासाठी लाभदायक ‘माठाचे पाणी’

water clay

आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली. उन्हाळ्यात तर माठातील पाणी हे शरीरासाठी अमृतच… माठ हा गरीबांचा फ्रीज मानला जातो. जर तुम्हाला असे वाटत असेल की फ्रीजच्या तुलनेत माठाचे पाणी कमी थंड असते तर तुम्ही चुकत आहात. तज्ञांच्या मते माठाच्या पाण्यात शरीरासाठी लाभदायक असे गुण असतात. माठातील पाणी अनेक रोगांशी लढण्यात फायदेशीर ठरते.

माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो. शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.

अधिकतर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही. मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या. सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते. उन्हाळ्यात खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.