शरीफ पाकिस्तानात परतताच बॉम्बस्फोट, 75 ठार

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान नवाज शरीफ मायदेशी परतत असतानाच पाकिस्तान बॉम्बस्फोटानी हादरला असून या स्फोटात सुमारे 75 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.आहे. जिओ टीव्हीने मात्र मृतांचा आकडा ७० असल्याचे म्हटले आहे. मृतांमध्ये बलुचिस्तान आवामी पार्टीचे नेते सिराज रायसांनी यांचा समावेश आहे. बलुचिस्तानातील मसटुंग भागात प्रचारसभेत स्फोट घडवून आणण्यात आला. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याने पाकिस्तानातील वातावरण तंग बनले आहे.

दुसऱ्या हल्ल्यात जमियत उलेमा-ए-इस्लामच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले.बन्नू जिल्ह्यात झालेल्या स्फोटात खैबर पख्तुनख्वा प्रांताचे माजी मुख्यमंत्री आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम फजलचे नेते अक्रम दुर्रानी जखमी झाले आहेत. एका बाइकवर बॉम्ब प्लांट करण्यात आला होता. या हल्ल्यात ताफ्याचे नेतृत्व करणारे नेते थोडक्यात बचावले. हल्ल्यात एकूण ३७ जण जखमी झाल्याची माहिती आहे.