शरद पवारांचा सारथी सोशल मीडियावर ठरतो हिट

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कारचे सारथ्य करणारा ड्रायव्हर गामा सोमा बोरोटे सोशल मीडियावर हीट होत आहे. तो सन 1971 पासून सध्या वाचकांचा आवडता ठरत आहे. अॅम्बेसिडर कारपासून ते सध्याच्या अलिशान गाड्या चालविण्यात गामाचा हातखंडा राहिला आहे. शरद पवार यांचे बालपणीचे मित्र मणियार यांच्या `विठ्ठलनामा` या पुस्तकात गामा यांच्यावर लेख लिहिण्यात आला आहे. तर पवार यांनीही आपल्या `लोक माझे सांगाती` या आत्मचरित्रातून गामाविषयी माहिती दिली.

पवार यांचे बालमित्र मणियार यांनी विठ्ठलनामा पुस्तकातून लिहिलेला गामा पवारांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच भावला आहे. उतरत्या वयातही काळे केस तेलाने चोपडून बसवलेला एक जेमतेम उंचीचा, मध्यम गोलकार पोटाचा माणूस. भल्या सकाळी कपाळाला भस्म लाऊन किंवा दोन भुवयांमध्ये ज्योतिबाच्या नावाने मोठा गोल टिळा लाऊन सिल्व्हर ओक निवासस्थानात बसलेला दिसतो.

देशाच्या राजकारणातील मोठे नेते शरद पवारांना साधा खोकला लागला तर त्याची मोठी बातमी होते. त्यामुळेच शरद पवारांचा ड्रायव्हर आणि जेवण बनवणारा आचारी कोण हेही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्दळ सुरू झाली कि, डाव्या खिशातला लाल-पिवळा कंगवा, मोबाईल आणि एखादे कागदी पाकीट सांभाळत त्याची नजर बंगल्यात सैरवैर फिरत असते. गेली 16 वर्षांपासून सीआयडी मालिकेचा चाहता असलेल्या गामाची नजरही सीआयडी पोलिसांप्रमाणेच पवारांच्या इर्दगिर्द फिरत असते.

गामा सोमा बोराटे आधी बारामतीच्या डॉक्टर शहांकडे कामाला होते. पवार यांनी शहांकडे एका चांगल्या ड्रायव्हरची गरज सांगितल्यानंतर डॉक्टरांनी गामाला साहेबांकडे पाठविले. तेव्हापासून (1971 पासून) ते आजपर्यंत गामा पवार यांच्या कारचे सारथ्य करीत आहे.

पवार यांचे स्वीय सहायक सतिश राऊत यांनी गामावर लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे. राऊत यांचा हा लेख सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पवारांच्या कारमध्ये कोण बससणार आणि कोण उतरणार याचा विशेष अधिकार गामाकडे आहे. पवारांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाची एक प्रत गामाकडे दिली जाते. गामा ती आवर्जून मागतो. दौरा कार्यक्रमात टायपिंगमध्ये क्वचितप्रसंगी काही चूक असली कि त्याच्या चाणाक्ष डोळयांनी ती टिपली जाते. शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने पुढे पायलट आणि मागे दोन एस्कॉर्ट अशा लवाजम्यासह गामाचा प्रवास सुरू होतो. कुठे जायचंय ?

जाण्याचा रस्ता कसा ? ट्रॅफीक किती आहे? हे सगळे गामा पी.एस.ओ. आणि पायलटशी चर्चा करत असतो. चर्चा लहान आवाजात कधीच नसते. त्यामुळेच की काय, बंदोबस्तातील सर्वच पोलिसांनी गामाला कॅम्प ऑफिसरचा दर्जा बहाल केलाय, असे लेखात म्हटले आहे.