नाणार प्रकल्पातील गावांचा दौऱ्यानंतरच भूमिका ठरवू : शरद पवार

मुंबई : सध्या भाजपा आणि शिवसेनामध्ये कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरु आहे. मात्र, आता याच वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे.नाणार रिफायनरी प्रकल्पातील गावांचा दौरा केल्यानंतरच भूमिका ठरवू, असे आश्वासन शरद पवार यांनी नाणार ग्रामस्थांना दिले आहे.

नाणार प्रकल्पात येणाऱ्या ग्रामस्थांनी आज शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. नाणार प्रकल्प कोकणात होऊ नये, यासाठी पवार यांनी सरकार दरबारी प्रयत्न करावे, अशी विनंती यावेळी ग्रामस्थांनी केली. या प्रकल्पामुळे नारळ, आंबा बागांचे नुकसान होणार आहे. तसेच पर्यावरणाला धोका उत्पन्न होऊन मासेमारीवरही विपरित परिणाम होणार आहे, असे नाणारचे सरपंच ओंकार प्रभू देसाई यांनी यावेळी सांगितले. शरद पवार यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. येत्या १० मे ला ते नियोजित नाणार प्रकल्पस्थळाला भेट देणार आहेत, तसेच तिथल्या काही अधिकाऱ्यांशीही चर्च करणार आहेत, अशी माहिती प्रभू देसाई यांनी यावेळी दिली.

यावेळी शरद पवार यांनी कठुआ बलात्कार प्रकरणावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरमध्ये जे झाले तो अस्वस्थ परिसर आहे. एवढं गंभीर प्रकरण झालं, हे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणाकडे केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे पवार म्हणाले. आज त्या मुलीच्या कुटुंबियांना, वकिलांना संरक्षण दिलं पाहिजे, राज्यकर्त्यांची बघ्याची भूमिका दिसते, या लोकांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो, अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली.

यादरम्यान, उत्तरप्रदेशमधील उन्नाव प्रकरणावरही शरद पवारांनी योगी सरकारला सुनावले आहे. उत्तरप्रदेशचं चित्र ऐकायला मिळते ते भयावह आहे. कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केली,जे घडलं ते दुर्दैवी आहे. ज्यांच्यावर आरोप आहे ती व्यक्ती लोकप्रतिनिधी आहे. मात्र, ते लोक सत्तेत सहभागी असल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही अशी टीका पवारांनी केली.