फडणवीस-पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यात नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली ते जाहीर करण्यात आले नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत .

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संबंधांबाबत तीन वर्षे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहे. एकीकडे भाजपवर टीका करायची व दुसरीकडे लोकशाहीच्या नावाखाली भाजप नेत्यांबरोबर सौहार्दाचे संबंध ठेवायचे ही राष्ट्रवादीची रणनीती आहे. अनेक नेत्यांवर असलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते भाजपबरोबर चांगले संबंध ठेवेल.

असा समज नागरिकांमध्ये आहे. गेल्या महिन्याभरात सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि स्वत: पवार यांच्या विविध कारणांमुळे झालेल्या सत्काराला मुख्यमंत्री वा भाजपचे इतर नेते खास उपस्थित राहिले होते. यादरम्यानही राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क केले जात होते.

रविवारी दुपारी १२ ते १२.४० या वेळेत या दोन नेत्यांची बैठक पार पडल्याचे समजते. बैठकीचा अजेंडा कुठेही जाहीर करण्यात आलेला नसल्याने बैठकीविषयी राजकीय क्षेत्रात विशेषत: शिवसेना व काँग्रेस पक्षात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.