शरद पवार संधीसाधू – महेश भारतीय

नागपूर : ‘काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या एकाच माळेच्या मणी आहेत. काँग्रेस ही भाजपाचीच ‘बी टीम’ आहे, तर शरद पवार हे देखील संधीसाधू नेते आहेत’, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सहकारी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी पत्रकारपरिषदेत केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची पोटनिवडणूक होणार असल्याने भारिप बहुजन महासंघ लढविणार आहे. या पोटनिवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी महेश भारतीय रविवारी भंडाऱ्यात जाणार आहे. शनिवारी ते नागपुरात असता त्यांना पत्रकारपरिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

यावेळी बोलतांना भारतीय म्हणाले की, ‘काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात राजकीय द्वेषभावनेने उमदेवार उभा केला होता. आज संविधानावर हल्ला होत असताना काँग्रेसची भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाही. कम्युनिस्टांनी धर्मांध शक्तींच्या विरोधात ठोस भूमिका घेतली, तशी काँग्रेसला घेता आली नाही.गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे भाजपासोबत असलेले मधुर संबंध जगजाहीर होते. ते दोघेही एकमेकांचे गोडवे गात होते. चार वर्षे बिझनेस अणि निवडणुकीपूर्वीच्या वर्षभरात पॉलिटिक्स ही पवारांची नीती असल्याची टीका भारतीय यांनी केली. भंडारा गोदिंया लोकसभा निवडणुकीत भारिपतर्फे उमदेवार दिला जाईल. येथे शक्यतो तरुणाला संधी दिली जाईल, असेही भारतीय यांनी अधोरेखित केले.

भारिप पक्ष वाढत आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चळवळ उभी करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी लवकरच शिबिर घेतले जाणार असून २१ व २२ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारले जाणार असल्याचे भारतीय यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या राजकारणावरही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.