यासाठी शरद पवारांनी राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला जाणे टाळले

नवी दिल्ली : २०१९ होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनापराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला जाणे टाळले. विरोधी पक्षांना एकत्र करणे व मुस्लिम मतदातारांना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये शरद पवारांच्या न जाण्यामागचे कारण राजकीय नसून ते नाट्य रसिक असल्याने आलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी इफ्तार पार्टीला जाण्याचे टाळले.

राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तथा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह जवळपास सगळेच विरोधी पक्षनेते उपस्थित होते. मात्र शरद पवार यांना मुंबईत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. शरद पवार हे रसिक आहेत, वाचन, नाटक हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. पवारांनी या कार्यक्रमाचं निमंत्रणही आधीच स्वीकारलं होतं. यामुळे दिल्लीतील इफ्तार पार्टीला न जाता त्यांनी मराठी नाट्य संमेलनाला आवर्जून हजेरी लावली.

काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डी. पी. त्रिपाठी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, सर्व भारतीय संयुक्त गणतांत्रिक मोर्चाचे (आसम) अजमल बदरुद्दीन, बहुजन समाज पक्षाचे सतीश मिश्रा, मार्क्सवादी पक्षाचे सीताराम येचुरी, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) दानिश अली, द्रमुकच्या कनिमोझी आणि शरद यादव यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.