शहिदांच्या पत्नीला एसटी प्रवास निःशुल्क

मुंबई : शहीद जवानाच्या पत्नीला एसटी महामंडळ आजीवन निःशुल्क प्रवास पास देणार आहे. महामंडळाच्या सर्व बसमधून वीरपत्नींना राज्यभर निःशुल्क प्रवास करता येईल. हा निर्ण १ मे, अर्थात महाराष्ट्र दिनापासून लागू होईल. एसटी महामंडळाने परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत वीरपत्नींचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वीरपत्नींसाठी आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. वीरपत्नींच्या माहितीसाठी महामंडळाने सैनिक कल्याण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. सैनिक कल्याण अधिकारी यांचाकडून जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. ती संबंधित एसटी जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवून वीरपत्नींसाठी आजीवन मोफत प्रवासी पास देण्यात येईल.