सावधान!!! ‘निपाह वायरस’ आलाय…

Nipah Virus

निपाह व्हायरसने सध्या केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. या सोबत राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात या व्हायरसने घबराटीचे वातावरण निर्माण केले आहे. या व्हायरसपासून मृत्यू पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा अद्याप पुढे आला नाही. मात्र, या आकड्यात सतत वाढ होत असल्याचे दिसते. वटवाघळाच्या संक्रमणातून पसरणाऱ्या या व्हायरसला नियंत्रीत करणारी लस अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार,निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. १९९८ साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. २००४ मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता.त्यावेळी तिथल्या लोकांनी खजूरच्या झाडापासून मिळणारा द्व पदार्थ खाल्ल्याचं समोर आलं होत. भारतातल्या केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरस हा हवेतून पसरत नाही .मात्र थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या,प्राण्याच्या संपर्कात आल्यास निपाह होऊ शकतो.

निपाह व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा,बेशुद्धावस्था,श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात. ताप,थकवा,शुद्ध हरपणं, चक्कर येणं, मळमळ,अस्वस्थ वाटणं ही लक्षणं ७ ते १० दिवस आढळतात. वरील लक्षणं आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील २४-४८ तासांमध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. अनेक रुग्णांमध्ये मेंदूशी निगडीत,श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृदयाच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचं निदर्शनास आलं आहे.

निपाह व्हायरसवर अद्याप तरी कोणतीही लस उपलब्ध नाही. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी संशोधक काम करत आहेत. पण, तोपर्यंत स्वत:हून होता येईल इतकी काळजी घेणे हाच इलाज आहे. त्यासाठी संशयास्पद ठिकाणची फळे, पक्षांनी खाल्लेली फळे न खाणे, खास करून खजूर न खाणे, निपाहची लागण झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात न येणे, डुकरांपासून दूर राहणे आदी गोष्टींची दक्षता घेता येऊ शकते.