‘संजू’ चित्रपट वादात; सेन्सॉर बोर्डात तक्रार

मुंबईः अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे . चित्रपटातील एका सीनवर तक्रारीत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. तसंच कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. चित्रपटाविरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘संजू’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये संजय दत्त रहात असलेल्या तुरुंगातील टॉयलेट तुंबून वाहताना दाखवलं आहे. पण सरकार आणि तुरुंग अधिकारी तुरुंगात पूर्ण सुविधा देतात. अशा घटना कधी ऐकण्यात आल्या नाहीत. तसंच नजिकच्या काळात गँगस्टरच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. पण असे सीन दाखवले गेले नाहीत. यामुळे या सीनने तुरुंग आणि तुरुंग अधिकाऱ्यांची नकारात्मक छवी पसरेल. म्हणून हा सीन चित्रपटातून वगळावा अन्यथा माननीय कोर्टात जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही, असं तक्रारदार पृथ्वी म्हस्के यांनी म्हटले .