भाजपाने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत

कल्याण : भाजपपानं आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता भाजपा-शिवसेना युती होणे शक्य नाही, हे सूचित केले आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा नेहमीचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपानं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले आहेत त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलं.

बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेलं वातावरण भ्रमनिरास करणारं आहे, अशी टीका राऊत यांनी केली. जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नाही असे सांगत त्यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.

यावेळी राऊत यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. शिवसेनेनं आवाज उठवल्यावर अजगरासारखा निपचित पडलेला विरोधी पक्ष जागा झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.