घरत यांच्याकडे मोठ्याप्रमाणात संपत्ती असण्याची शक्यता

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त संजय घरत यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एसीबीनं त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यास सुरुवात केली असून, त्यांनी गैरमार्गाने मोठ्याप्रमाणात माया जमविली असल्याची माहिती समोर येत आहे. घरत यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे ४२ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३५ लाख रुपये देण्याचं ठरलं होत. त्यानंतर महापालिका मुख्यालयातल्या घरत यांच्या दालनात काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास आठ लाख रुपयांचा पहिला हप्ता घरत यांनी स्वीकारला. यावेळी अँटी करप्शन ब्युरोने त्यांना रंगेहाथ अटक केली.

एसीबीने घरत यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यास सुरुवात केली असून त्यांच्या गाड्या, घरं यांची तपासणी सुरु झाली आहे. तर त्यांच्या दालनात या लाचेच्या रकमेसह आणखी काही रक्कमही सापडल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घरत यांच्यावरील या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. घरत यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांच्या निलंबनाचा ठरावही महासभेनं केला पास केला होता. आता घरत यांना एसीबीने पकडल्यानंतर कल्याणमध्ये नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. तसंच त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.