संभाजी भिडेंच्या वक्तव्याची चौकशी होणार

नाशिक : माझ्या बागेत पिकणारे आंबे खाल्ल्यास अपत्यप्राप्ती होते असे संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल नाशिक महापालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे. आरोग्य संचलनालयाकडून महापालिकेला देण्यात आलेल्या पत्रानंतर पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून चौकशी होणार आहे.

राज्य कुटुंब कल्याण विभागामार्फत नाशिक महापालिकेला बुधवारी पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्याने मुलं होतात, या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भिडेंच्या त्या वक्तव्यात तथ्य न आढळल्यास पीसीपीएनडीटी अक्टनुसार भिडेंवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक महापालिकेला हे पत्र पाठवलं आहे. मात्र संभाजी भिडेंचा पत्ता नसल्याने नोटीस कुठे पाठवायची असा प्रश्न नाशिक महापालिका प्रशासनाला पडला आहे.