पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता

दुबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा भडका दिवसेंदिवस होत असताना आता पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत येत्या काही दिवसात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

सध्या कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ६० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली आहे. सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी मार्च २०१८ पर्यंत पुरवठा आणि उत्पादनात कपात करण्याचं समर्थन केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर याचा परिणाम होऊ शकतो. कारण भारत इंधनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दर दिवशी बदलतात.

ओपेक (इंधन निर्यातदार देशांची संघटना) मध्ये सहभागी झालेल्या देशांमध्ये सौदी अरेबिया हा सर्वात मोठा आणि प्रभावशाली तेल उत्पादक देश आहे. तसेच तेल उत्पादक देशांचा समूह असलेल्या ओपेकमध्ये १४ देशांचा समावेश आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरला होणाऱ्या ओपेकच्या बैठकीत पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे उत्पादनात कमी करण्यावर एकमत होऊ शकतं असे संकेत प्रिंस मोहम्मद यांच्या या वक्तव्यामुळे मिळाले आहेत.