रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे : महापालिकेचे आदेश

ठाणे : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ५ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. आयुक्‍त गोविंद बोडके यांनी रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजविण्‍यासंदर्भात तातडीची उपाययोजना म्‍हणून आगामी २ दिवसांत कार्यवाही करण्‍याचे आदेश दिले आहेत. ही सर्व कामे प्रामुख्याने करायची आहेत. तर सर्वेक्षणाची कार्यवाही देखील तत्‍काळ सुरू करण्‍याचे आदेश आयुक्‍तांनी तांत्रिक विभागास दिले.

महापालिकेच्‍या सर्व तांत्रिक अधिकारी/कर्मचारी आणि प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांची १४ आणि १५ जुलैची सुट्टीदेखील रद्द करण्‍यात आली आहे. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व कार्यकारी अभियंता/उपअभियंता/‍कनिष्‍ठ अभियंता यांनी त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील रस्‍त्‍यांचा उंच सखलपणा आणि रस्‍त्‍यांवर पडलेले खड्ड्यांचे संबंधित प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्व्‍हेक्षण करुन शनिवार १४ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अहवाल सादरकरण्याचे आदेश दिले आहे. तर ड्रेनेज लाइनच्‍या संदर्भात जल अभियंता आणि त्‍यांच्‍या अधिपत्‍याखालील अभियंते यांनी त्‍यांना सहकार्य करावे, असे देखील संबधितांना कळविण्‍यात आले आहे.

यासंदर्भात आढावा घेण्‍यासाठी शनिवारी पुन्हा सायंकाळी ५ वाजता आयुक्‍त स्‍वतः मुख्‍यालयात एक विशेष बैठक घेणार आहेत. या बैठकीच्यावेळी उपरोक्‍त अभियंत्‍यांनी तयार केलेला आपला अहवाल आयुक्‍तांसमोर सादर करावयाचा आहे. या बैठकीस शहर अभियंता, जल अभियंता आणि त्‍यांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व कार्यकारी अभियंते व उप अभियंते तसेच सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी उपस्थित रहावयाचे आहे, असे देखील आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत.