युती सरकारला आश्वस्त करणारे निकाल

महाराष्ट्रातील काही नगर परिषदांत नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे लागलेले निकाल राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला आश्वस्त करणारे वाटावेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विरोधी पक्षांनी व विशेषतः काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी देवेन्र्द फडणवीस सरकारविरुद्ध टीकेचे मोहोळ उठवण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न केला. युती सरकारमधील शिवसेनेला डिवचून सरकारमधून बाहेर पडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. ते साध्य झाले नाही तेव्हा जनतेला सरकारशी असहकार करण्याचे घातक आवाहन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. परंतु इतके सव्यापसव्य करूनही जनतेत राज्य सरकारविषयी रोष निर्माण करण्यात त्यांना अपयशच आले. या पार्श्वभूमीवर मोजक्या का होईना नगर परिषदांच्या निवडणुकांत काय घडेल याविषयी सरकार पक्षांत धाकधूक होती पण गुरूवारी लागलेल्या निवडणूक निकालांनी विरोधी पक्षांनाच धोबीपछाड मिळून राज्य सरकारवर एकाप्रकारे विस्वासच व्यक्त झाला असे म्हणायला वाव आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे उपोषण ज्यांच्या शिष्टाईने मागे घेतले ते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांचे वर्चस्व असलेल्या जामनेर नगरपरिषदेवर भाजपने अक्षरशः शतप्रतिशत विजय प्राप्त केला आहे. नगर परिषदेच्या २४ पैकी २४ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविला असून तेच या विजयाचे हिरो ठरले आहेत. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या सुद्धा निवडून आल्या आहेत. त्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अंजना पवार यांचा तब्बल आठ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. गत निवडणुकीत पहिली अडीचवर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती जामनेर नगरपंचायतीची सत्ता होती. ती सत्ता महाजनांनी खेचून आणली. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भाजपने सर्वच्या सर्व जागांवर आघाडी घेतली होती. अवघ्या तीन तासांतच या निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले अन् सर्वच्या सर्व २४ जागा भाजपने आपल्या खात्यात टाकल्या.

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असा पूर्वापार समज आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तो खोटा ठरवला. याच भागातील कोल्हापूरमधील आजरा नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपप्रणित आजरा शहर विकास आघाडीने दणदणीत यश मिळविले. या आघाडीने १७ पैकी ९ जागा जिंकत आजरा प्रभुत्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी मागे पडून त्यांना फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस-राष्ट्रवादीला असाच मोठा दणका कणकवली आणि रत्नागिरीतल्या गुहागरमध्य़ेदेखील बसला. कणकवली म्हणजे नारायण राणेंचा जिल्हा असे समीकरण सर्वांना ठाऊक आहे. अलीकडेच भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेलेल्या राणेंच्या स्वाभिमानी पक्षाने कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने पहिल्याच झटक्यात १७ पैकी १० जागा जिंकत शिवसेना युतीला पराभूत करून नगरपंचायतीवर झेंडा रोवला. गंमत म्हणजे या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाने नावापुरता का होईना राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता केला व त्या आघाडीचे समीर नलावडे हे सुद्धा निवडून आले आहेत. भाजपमध्ये आलेल्या नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादीशी समझोता करून ही निवडणूक लढवल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. राणे यांनी १७ पैकी १० जागा जिंकून सिंधुदुर्गात आपलेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एका जागेवर विजय झाला आहे. शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळविला आहे. भाजप-शिवसेना युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांचा स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीचे समीर नलावडे यांनी ३७ मतांनी पराभव केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरची निवडणूकही अशाच चुरशीमुळे लक्षवेधी ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांची तेथे प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण या गुहागर नगरपंचायत निवडणुकीत त्यांना जोरदार फटका बसला आहे. भास्कर जाधव स्वत: गुहागरमधले आमदार आहेत. पण गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली. त्यांच्या विरोधात असणा-या शिवसेनेलाही फक्त एकच जागा मिळाली. पण शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने मात्र नऊ जागा मिळवल्या. त्यामुळे नगरपंचायतीत शिवसेनेच्या पाठिंब्याने शहर विकास आघाडीची सत्ता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे भास्कर जाधव हे पूर्वी शिवसेनेमध्ये होते. सेना सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात विविध मंत्रिपदे भूषवणा-या जाधवांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदसुद्धा सांभाळले होते. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात गुहागर नगरपंचायत अस्तित्वात आली पण आता बालेकिल्ल्यातच त्यांना पराभव बघावा लागला आहे. या नगरपंचायतीत भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक म्हणजे १३ जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र भाजपाने बाजी मारली. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा परदेशी यांनी शिवसेना उमेदवाराचा १७६४ मतांनी पराभव केला. वैजापूर नगरपरिषदेत एकूण २३ जागा आहेत. त्यातील १३ जागा शिवसेनेने, भाजपाने ९ आणि काँग्रेसने फक्त एका जागेवर विजय मिळवला. विशेष म्हणजे या भागीत शिवसेनेचे ब-याच वर्षांपासून वर्चस्व होते. त्यामुळे शिवसेनेने वैजापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे तर वैजापूरमध्ये तळ ठोकून बसले होते तरीही त्यांना फटका बसलाच.

चंद्रशेखर जोशी