‘मी सैन्यात भरती होण्यास तयार’: मनसे कार्यकर्त्याचे आठवलेंना पत्राद्वारे प्रतिउत्तर

मुंबई: एल्फिन्स्टन आहे. रोड स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात वाद चिघळला आहे.

यावर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण करण्याऐवजी सीमारेषेवर जाऊन लढावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला होता. यावर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी सीमेवर जाण्यास तयार असून मला हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करुन द्यावे’ अशी मागणी मनसेचे सचिव इरफान शेख यांनी केली आहे.

मनसेच्या या आंदोलनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली होती. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करुन त्यांना मारहाण करण्याऐवजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सीमारेषेवर जाऊन पाकिस्तानच्या सैनिकांना मारावे, असे आठवलेंनी म्हटले होते. फेरीवाल्यांनी कुठे बसावे आणि कुठे नाही हे मनसेचे कार्यकर्ते ठरवू शकत नाही. फेरीवाल्यांना मारहाण करण्याच्या अधिकार मनसेला नाही, असे त्यांनी सुनावले होते.

रामदास आठवले यांच्या टीकेला मनसेचे सचिव इरफान शेख यांनी प्रत्युत्तर दिले. इरफान शेख यांनी आठवलेंना खुले पत्र लिहीले आहे. तुम्ही दिलेले आव्हान मी स्वीकारण्यास तयार आहे. मला आपण केंद्रीय मंत्री म्हणून सीमेवर जाण्याची परवानगी द्यावी व हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करून द्यावे, आपण स्वतः सीमेवर मला भारतीय जवानांसोबत सोडण्यास यावे, असे इरफान शेख यांनी पत्रात म्हटले आहे. ज्या देशात राहता, त्या देशाच्या रक्षणासाठी लढा ही शिकवण मला माझ्या धर्माने दिली आहे, त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारतो असे त्यांनी नमूद केले.