‘डिमांड ड्राफ्ट’ नियमात झाला हा महत्वपूर्ण बदल ; कोणता ते जाणून घ्या !

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने डिमांड ड्राफ्ट (डीडी) च्या नियमात बदल केला असून नवा नियम येत्या १५ सेप्टेंबरपासून लागू होणार आहे. या नव्या नियमात डिमांड ड्राफ्टवर बनविणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करणे केंद्रीय बँकेने बंधनकारक केले आहे. बँकेच्या शाखेतून डिमांड ड्राफ्ट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नावसुद्धा डीडीच्या फ्रंटवर लिहिणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने डिमांड ड्राफ्ट करायचा आहे त्या व्यक्तीचा किंवा संस्थेच्या नावाचा उल्लेख केला जायचा. परंतु, आता या नियमात बदल करण्यात आला आहे.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याविषयी माहिती दिली असून डिमांड ड्राफ्टची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती होत नसल्याने उद्भवलेली अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. डीडी जमा करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर न आल्याने याचा वापर मणी लॉन्ड्रींगसाठी केला जाऊ शकतो म्हणून, आरबीआयने डीडीच्या दर्शनीभागावर खरेदीदाराच्या नावाचा उल्लेख करण्याचे ठरविले आहे.