वरिष्ठ नेते कमी पडल्याने भाजपाचा कणकवलीत पराभव : रविंद्र चव्हाण

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत वरिष्ठ नेते कमी पडल्याने नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागल्याची कबुली राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यांनी कणकवली शहरातील एका हॉटलेमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत हे म्हटल्याचे समजते. शिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा सल्लाही दिला.

पराभवाने खचून न जाता पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं समजतं. भाजपचे १०० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. वरिष्ठ स्तरावरून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे भाजपमध्ये एकी नसल्याचे दिसून आले. या बैठकीत पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्यात आले. चार प्रभागांमध्ये शिवसेनेशी झालेली मैत्रीपूर्ण लढत अंगलट आल्यामुळे पुढील निवडणुकीत कुबड्या नकोच असा सूर बैठकीत उमटला. शिवसेनेच्या कुरबुरी सांगू नका, तर आलेले अनुभव उराशी बाळगून मार्गक्रमण करा, यश नक्कीच मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.