बलात्कार : आरोपींचा वाहतूक आणि शस्त्र परवाना होणार रद्द

- हरयाणा सरकारचा निर्णय

पंचकुला : हरियाणामध्ये, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत आरोपींचा वाहतूक आणि शस्त्र परवाना रद्द राहील आणि त्यांचे निवृत्तीवेतनही रोखलं जाईल. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पंचकुला येथे महिला सक्षमीकरणासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

१२ वर्षांखालील बालिकेवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्यांना मृत्यूदंड द्या, असा ठरावही राज्य सरकारने ठेवला आहे. आता त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

खट्टर पुढे म्हणाले की आरोपींना फक्त योग्य दरात धान्य मिळण्याची सवलत सुरू राहील. पण निकालात दोषी ठरणाऱ्यांबाबत मात्र स्थिती बदलणार नाही.

सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी एक नवी योजना स्वातंत्र्यदिनी किंवा २६ ऑगस्टला रक्षाबंधननिमित्त जाहीर करणार आहे. बलात्कार पीडितेला राज्य सरकारने दिलेल्या वकिलाव्यतिरिक्त दुसऱ्या वकिलाची नियुक्ती करण्याची इच्छा असेल तर राज्य सरकार २२ हजारांची आर्थिक मदत देणार आहे. यासोबत बलात्कार आणि छेडछाडीच्या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांच्या कामात अडथळा येऊ नये यासाठीही तरतुदी केल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगिलते.