राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश 11 डिसेंबरपूर्वी, खडसेंबाबतही सकारात्मक : चंद्रकांत पाटील

पंढरपूर : स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणेंना 11 डिसेंबरपूर्वी मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आहे, हिवाळी अधिवेशनापूर्वी राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित मानला जात आहे.

पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर चंद्रकांत पाटील बोलत होते. एकनाथ खडसे यांच्याबद्दलही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यातील बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दुसरीकडे राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेना खोडा घालत असल्याची माहिती आहे. तथापि, शिवसेना याबाबत मदत करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जाचा बोजा वाढल्याने कोणत्याही विकासकामांना कात्र लावली जाणार नाही, असे स्पष्ट करताना पाटील म्हणाले, खर्च वाढला असून उत्पन्न वाढीला मर्यादा आहेत. राज्याच्या तिजोरीवरील कर्ज 4 लाख 17 हजार कोटींवर गेले असल्याचेही ते म्हणाले.