मुस्लिमांना मिळालेली जमीनही राम मंदिराला : शिया बोर्ड

Picture of Babari Masjit

नवी दिल्ली : अयोध्यामधील मुस्लिमांना मिळालेल्या वादग्रस्त जमिनीचा खरा हक्क केंद्रीय शिया वक्फ बोर्डाचाच आहे. कारण बाबरी मशीद मीर बाकी यांनी बनवली होती. तसेच, ते एक शिया होते. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिमांना दिलेली एक तृतियांश जमीन राम मंदिर बनवण्यासाठी हिंदुंना दान द्यायची आहे, असे आज केंद्रीय शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. शिया वक्फ बोर्डाच्यावतीने ज्येष्ठ वकील एस. एन. सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.

देशाची एकता, अखंडता, शांती टिकून राहण्यासाठी शिया वक्फ बोर्ड अयोध्यामधील वादग्रस्त जमीन राममंदिरासाठी दान करण्याच्या बाजुने आहे. तर दुसरीकडे, बामियान बुद्धाच्या मूर्त्यांना मुस्लिम तालिबानने नष्ट केले होते. तर बाबरी मशिदीला हिंदू तालिबानने उद्ध्वस्त केले आहे, असे मुस्लिम आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे ज्येष्ठ वकील राजीव धवन म्हणाले.

राममंदिरासाठी झालेल्या आंदोलनात ६ डिसेंबर १९९२ साली अयोध्यामधील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यांनतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० साली अयोध्या टायटल वादाप्रकरणी निर्णय दिला होता. त्यावेळी न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते की, वादग्रस्त जमिनीचे तीन भाग झाले पाहिजेत. ज्या जागेवर रामची मूर्ती आहे ती जागा राम मंदिराला द्यायला हवी. सीता रसोई आणि राम चबुतरा निर्मोही आखाड्याला समान जागावाटप झाल्यानंतर उर्वरित एक तृतियांश जागा सुन्नी वक्फ बोर्डाला द्यायला हवी, असे न्यायालयाने आदेश दिले होते.

मात्र, आज सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पक्षकारांची राम मंदिराच्या जमिनीसंबंधी सुनावणी करण्यात आली. यापूर्वी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश एस. एस नजीर यांच्या विशेष खंडपीठासमोर १७ मे रोजी हिंदू संघटनांची सुनावणी झाली होती.