पुण्याचे अनधिकृत फेरीवाले हटवा, ‘मनसे’ ची मागणी !

मुंबई: आता मनसेने मुंबईपाठोपाठ पुण्यातल्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी केली आहे. जर मनपा प्रशासनाने लवकर ही कारवाई केली नाही तर मनसे आपल्या पद्धतीने त्यांना हटवेल असे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत फेरीवाले आहेत. यांच्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. या फेरीवाल्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून हा मुद्दा येत्या दोन दिवसांत मार्गी लावावा, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांना हटवतील, अशी शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबई रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यासाठी राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी प्रशासनाने अनाधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी प्रशासनाला १५ दिवासांची मुदत दिली होती. या मुदतीनंतर फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने ठाण्यापासून वसईपर्यंत आणि मालाड ते कल्याण-डोंबिवलीपर्यंत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना हटविले होते.