पाऊस सरासरीच्या 97 टक्के पडणार

नवी दिल्ली : स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे, येत्या पावसाळ्यात पाऊस चांगला म्हणजे, सरासरीच्या 97 टक्के पडणार आहे.
भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या पावसाचा दिलासादायक असा हा पहिला अंदाज वर्तवला आहे.

या वर्षाच्या पावसाळ्याबद्दल अंदाज व्यक्त करतांना स्कायमेटने तर, या वर्षी भारतात सरासरीच्या १०० टक्के पाऊस होईल असे भाकीत केले आहे.

यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊस सामान्य राहील. विशेष म्हणजे दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल.

विशेष उल्लेखनीय म्हणजे या वर्षी दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के वर्तवण्यात आला आहे.

पावसाचा महिनानिहाय अंदाज ( स्कायमेट )

* जून १११ टक्के

* जुलै ९७ टक्के

* ऑगस्ट ९६ टक्के

* सप्टेंबर १०१ टक्के पाऊस पडेल.

सरासरी म्हणजे किती?

८९० मि. मी. पाऊस सरासरी इतका मानला जातो. त्यापेक्षा १९ टक्के कमी-अधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतकाच मानला जातो.

२०१७ मध्ये १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०१६ मध्ये सरासरीच्या १०६ टक्के म्हणजे, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.

२०१४ आणि २०१६ हे दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची, दुष्काळसदृश गेली. मराठवाड्यात भीषण स्थिती होती. २०१४ मध्ये रासरीच्या १२ टक्के कमी म्हणजे ७८१.८ तर २०१५ मध्ये सरासरीच्या १४ टक्के कमी म्हणजे ७६०. ६ मि. मी. पाऊस पडला.