कोल्हापुरात पावसाने झोडपले

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उष्मा जाणवत होता. मात्र मुसळधार पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरासह संपुर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. आज सायंकाळी सुमारे पाच वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी चार वाजल्यानंतर वळवाचा मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांना उष्म्यापासून दिलासा मिळाळ आहे.

बुधवारी सायंकाळी देखील सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने कोल्हापूर शहराला झोडपले होते. शहरातील मोठे फलक,काही ठिकाणी मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडले होते. आज दुपारपासून अचानक वातावरणात बदल झाला आणि सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील फेरीवाले, सुट्टयांनिमित्य आलेले पर्यटक, तसेच अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या भक्तांसह स्थानिक नागरिकांची आजच्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस संपूर्ण जिल्ह्यातील काही भागात पडत होता.