भगव्या दहशवादाप्रकरणी राहुल गांधींना माफी मागण्याचा प्रश्नच नाही – शिवराज पाटील

नवी दिल्ली : हैदराबादेतील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने अखेर 11 वर्षानंतर निकाल देत आहे. यात सबळ पुराव्याअभावी स्वामी असीमानंद यांच्यासह ५ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. आरोपींची सुटका करण्यात आल्यानंतर काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. या निकालानंतर हिंदूना बदनाम करण्याचा आरोप भाजपानं काँग्रेसवर केला आहे. त्यामुळे काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली. भाजपानं केलेल्या आरोपावर काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांनी मौन बागळल्याचं दिसत आहे. मात्र काँग्रेसनेही उत्तर देत माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा इतर कुणीही भगव्या दहशतवाद प्रकरणी माफी मागणार नाही.’ असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी दिलं आहे. भगवा दहशतवादाचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी माफी मागावी या भाजपच्या मागणीवर शिवराज पाटील म्हणाले की, ‘अशी अनेक प्रकरणं आहेत की, ज्यासाठी भाजपने माफी मागायला हवी. राहुल गांधी यांनी नेमकी कशासाठी माफी मागायला हवी? त्यांच्या घरातील तीन-तीन जणांचे खून झाले. पण तरीही त्यांनी कोणावर आरोप केले नाही.’

तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते पी.एल.पुनिया हेही राहुल गांधींच्या मदतीला धावले आहे. ते म्हणाले की, ‘भगवा दहशतवाद असे काही नसते आणि दहशतवाद हा कोणत्याही धर्म किंवा समुदायासोबत जोडला जाऊ शकत नाही’. शिवाय राहुल गांधी किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यानं भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग कधी केलेला नव्हता.