राहुल गांधींची खरी कामगिरी २०१९ मध्ये दिसून पडेल – नवज्योतसिंग सिद्धू

नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपाने मुसंडी मारली असून, कर्नाटकात सत्ता बदलाचे संकेत मिळताच काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या बचावासाठी पुढे आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिलाच पराभव होत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील उगवता तारा असून २०१९ नक्कीच वेगळी परिस्थिती बघायला मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

त्यावेळी सिद्धू म्हणाले की, मी माझे संपूर्ण जीवन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अर्पण केले आहे. राहुल भाई हे भारतीय राजकारणातील उगवता तारा आहेत. २०१९ मध्ये निश्चितच वेगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. अन्य राजकीय पक्ष राहुल यांना पाठिंबा देतील. जोपर्यंत माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेल तोपर्यंत मी राहुल गांधींसोबत असेन, असे सिद्धू यांनी स्पष्ट केले.