मोदींनी शेतकऱ्यांना आधार न देता विश्वासघात केला – राहुल गांधी

चंद्रपूर : आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नांदेड या गावी भेट देऊन शेतकरी मुद्द्यावर संवाद साधून शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न जाणून घेतले. नुकताच एचमटी धानाचे जनक आणि कृषिभूषण असलेले सामान्य शेतकरी दादाजी खोब्रागडे यांचे निधन झाले होते. त्याअनुषंगाने राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे याना श्रद्धांजली वाहिण्यासाठी नांदेड गावाला भेट दिली.
राहुल गांधींनी गावात आगमन करताच सर्वप्रथम दादाजी खोब्रागडे यांचं निवासस्थान गाठून त्यांनी दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी जाहीर सभेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, आज शेतकरी मोठ्या आर्थिक संकताटं सापडला असून, आता शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आधार देण्याची गरज होती. मात्र त्यांनी आधार न देता त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेले कर्जमाफीचे पैसे उद्योगपतींच्या कर्जफेडीसाठी वापरले असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
देशात सत्तेवर असलेले नरेंद्र मोदींचे सरकार १५/२० उद्योगपतींसाठीच काम करीत आहे. नीरव मोदी सारख्या कर्जबुडव्या उद्योगपतींसाठी मदत करण्यात व्यस्त आहे. नीरव मोदीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांच्याकडे पैसे नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सामान्य जनतेशी मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही. हे सरकार लोकांच्या खिशातून पैसे काढून  अमीर लोकांच्या घरात भरत आहे. सरकारवर हल्ला चढवतांना राहुल गांधी म्हणाले की,कोणत्याही नेत्याचे काम रस्ता दाखविण्याचे असते पण मोदी नुसते खोटे बोलण्यात व्यस्त आहेत. हे आता लोकांच्या लक्षात आहे म्हणूनच शेतकरी व युवकांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना मोदी सरकारने मदत केली यांनी किती लोकांना रोजगार दिला. अशीच मदत दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या शेतकऱ्यांना मिळाली असती तर त्यांनी ५० हजार लोकांना रोजगार दिला असता असेही राहुल गांधी यांनी सागर खोब्रागडे यांनी विचारलेल्या प्रश्नादरम्यान सांगितले.
तर अविशा रोकडे या शेतकरी महिलेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढायचे असेल कर्जमाफी सोबतच त्यांचा शेतमाल सरळ ग्राहकांपर्यंत कसा पोहचेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात  अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे. फळे भाजीपाला टिकवण्यासाठी शीतगृह बांधण्याची गरज आहे. मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ते लोकांच लक्ष दुसरीकडे विचलित करत आहे. आता ह्या सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी कॉंग्रेसला मदत करावी असे आवाहन करत मी मोदींप्रमाणे खोटे आश्वासन देण्यासाठी येथे नाही आलो तर विश्वास देण्यासाठी आलो असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
सभेच्या शेवटी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे २ लाख ५० हजारांचा धनादेश राहुल गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ५ लक्ष तर माजी खासदार नरेश पुगलीया १ लाखाची मदतीची घोषणा केली.
यावेळी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही थोडक्यात मार्गदर्शन झाले. यावेळी मंचावर आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर , माजी खासदार नरेश पुगलीया, मारोतराव कोवासे, माजी आमदार अविनाश वारजूकर, आनंदराव गेडाम, अतुल लोंढे, जि.प.चे माजी अध्यक्ष सतिश वारजूकर, ब्लाक काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रफुल खापर्डे , पंजाबराव गावंडे उपस्थित होते.