शाळेत आधार कार्ड क्रमांक न दिल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण

पुणे : येथे आधार कार्ड नंबर न आणल्याने शिक्षकाकडून १० वर्षीय विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मोरया शिक्षण संस्थेत घडली असून, मारहाण करणाऱ्या वर्गशिक्षकावर बाल संरक्षण अधिनिय आणि मारहाण कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव श्रीकांत बेल्ले असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान एका खासगी रुग्णालयात श्रीकांतला दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. घरच्यांना घटलेल्या प्रकाराबद्दल सांगायलाही तो घाबरत होता. चालताना त्याला त्रास होत असल्याने घरच्यांनी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. जेव्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी त्याला दाखल करण्यात आलं, तेव्हा त्याने शाळेत आधारकार्ड नंबर न दिल्याने त्याला शिक्षकाकडून मारहाण झाल्याचं सांगितलं. त्यांनतर खरात या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्यापही शिक्षकाचे पूर्ण नाव कळलेले नाही. या प्रकरणी संगीता बेल्ले यांनी फिर्याद दिली आहे.

मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलीस सध्या घटनेचा तपास करत असून, अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.