येतो आहे, प्रियांका चोप्राचा मराठी चित्रपट ‘पाणी’

मुंबई : प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्सतर्फे ‘पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रियांकाने आज ट्वीट करीत ‘पाणी ’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली. पाण्याच्या भीषण समस्येवर प्रकाश टाकणारा ‘पाणी’ हा चित्रपट मराठवाडय़ातील सत्य घटनेवर आधारित असेल. नगरवाडीतील गावकऱ्यांच्या जिद्दीची कहाणी यामध्ये बघायला मिळेल. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने एकही मुलगी गावात लग्न करून यायला तयार होत नाही.

यामुळे नायकाचे लग्न जुळवताना अडचणी येतात. अशावेळी गावातील पाणीप्रश्न तो कसा सोडवतो, याची कथा म्हणजे ‘पाणी’ हा चित्रपट आहे.

‘पाणी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. सत्यघटनेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे. आदिनाथ पहिल्यांदाच दिग्दर्शकाची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे ‘पाणी’ चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ‘पाणी’ हा प्रियाकांचा चौथा मराठी चित्रपट आहे. याआधी तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट व्हेंटिलेटर, काय रे रास्कला या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिचा फायरब्रँड या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराजे पाटील करणार आहेत.