प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिल्लीतील डॉ.आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 13 एप्रिल रोजी दिल्लीतील 26, अलीपूर रोड स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन होणार आहे.

भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे दिल्ली स्थित 26, अलीपूर रोड येथील महापरिनिर्वाण स्थळाच्या ठिकाणी त्यांच्या जीवनकार्याचा व योगदानाचा परिचय करून देणारे स्मारक उभारण्यात आले आहे. 21 मार्च 2016 रोजी या स्मारकाच्या बांधकामाची कौनशिला प्रधानमंत्री मोदी यांनी ठेवली होती.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 नोव्हेंबर 1951 ला केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. त्यानंतर ते दिल्लीतील 26, अलीपूर रोड येथील सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहू लागले पुढे 6डिसेंबर 1956 रोजी याच ठिकाणी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. डॉ. आंबेडकरांच्या स्मृती प्रित्यर्थ्य माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी 2 डिसेंबर 2003 ही वास्तू देशाला समर्पित केली.

डॉ. आंबेडकर स्मारकाची वैशिष्टे

भारतीय संविधान निर्माते ही ओळख जनतेपर्यंत पोचविण्यासाठी स्मारकास पुस्तकाचा आकार देण्यात आला आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांची 12 फुटांची कास्य प्रतिमा, प्रदर्शन स्थळ, तथागत गौतम बुध्दांची ध्यानस्थ प्रतिमा येथे आहे. या स्मारकाच्या ठिकाणी ध्यान केंद्र, बोधी वृक्ष आणि कारंजे ही आहेत.

एकूण 7374 चौ.मीटर उंचीचे हे स्मारक एकूण 6758 चौ. मीटर क्षेत्रावर उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या प्रवेश द्वारावर 11 मिटर उंचीचे अशोक स्तंभ आणि याच्या मागे ध्यान केंद्र आहे. या सोबत पावसाच्या पाण्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली जलसिंचन व्यवस्था, सौर उर्जेचे सयंत्र बसविण्यात आले आहे.