प्रदुषणमुक्त नदी आराखडा तयार करा- रामदास कदम

मुंबई : मुंबईतील नद्यांचे प्रदुषण थांबविण्यासाठी ‘प्रदुषणमुक्त नदी आराखडा’ 1 जून 2018 पर्यंत तयार करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबईतील नदी प्रदुषणाबाबतची बैठक आज मंत्रालयात झाली. श्री. कदम म्हणाले, मुंबईतील मीठी नदी, ओशिवरा, दहिसर नद्यांचे प्रदुषण थांबविणे गरजेचे आहे. आजुबाजूच्या घरातील, कारखान्यातील दुषित पाणी सरळ नदीत सोडल्याने त्या प्रदुषित झाल्या आहेत. काही ठिकाणी कचरा, प्लास्टिक व अन्य टाकाऊ वस्तू थेट नदीत टाकल्याने नद्या अस्वच्छ झाल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी नदी काठच्या परिसरात लोकांनी अतिक्रमण करुन घरे, झोपड्या बांधल्या आहेत. अशा लोकांची यादी करुन पोलीसांना द्यावी. त्यांच्या मदतीने अतिक्रमणे तोडावीत. त्याचबरोबर सांडपाणी, रासायनिक पाणी नद्यांमध्ये सोडणाऱ्यावरही कडक कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.